ता. मिरज, जि. सांगली



.png)

.png)

.png)

.png)

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील सांगली शहरापासुन् 5 किमी उत्तरे कडे असलेलं कर्नाळ हे गाव, म्हणजे निसर्गरम्य वातावरण. आणि आधुनिक सुख-सुविधांचा, सुंदर मिलाफ होय. छत्रपती शिवरायांच्या घोड्याच्या टापांनी पावन झालेल्या या भूमीला छत्रपती शाहू महाराज, रामदास स्वामींचाही पदस्पर्श लाभला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ,सांगली पटवर्धन सरकारांच्या अखत्यारीत येत असलेल्या या गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना १/१/१९५६ रोजी झाली. जवळच पाच किलोमीटरवर मोठे शहर सांगली. आणि तालुक्याचं ठिकाण असलेलं मिरज शहर .दहा किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या 5878 इतकी आहे .यामध्ये 3036 पुरुष व 2842 महिला असून गावातील एकूण कुटुंब संख्या 1231 आहे तर अनुसुचित जातीची लोकसंख्या 351 आहे. गावाला चारही बाजूने पक्का रस्ता आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंदिस्त गटार आहे. गावातील 80 टक्के घरांचे सांडपाणी हे बंदिस्त गटर द्वारे वाहून नेले जाते . उर्वरित घरांसाठी शोषखड्डे आहेत. गावातिल लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व दुग्धव्यवसाय आहे. गावाचे एकूण क्षेत्र् 1082 हेक्टर आहे . सर्व क्षेत्र् हे बागायति असून ऊस भाजीपाला यासारखि पिके घेतली जातात. चैत्र् पौर्णिमेला हनुमान जयंती गावाची यात्रा भरते यामध्ये सात दिवस कीर्तन प्रवचन् व् पारायण असते .सातव्या दिवशी पालखी ने यात्रेचि सांगता होत असते . कर्नाळ गाव हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असल्याने गावात अंबरसो बाबाचा उरूस हि साजरा केला जातो.
झुळूझुळू पाण्याने सदैव वाहणारा गावओढा... हिरवंगार लुसलुसीत गवताचं कुरण... लोळण घेणारे पल्लेबाज ऊसाचे मळे... द्राक्षाच्या ओझ्यानं वाकून गेलेल्या बागा... आणि बांधा बांधावर हमखास आढळणारी चिंच, जांभूळ व आंब्याची हिरवीगार झाडे.. टुमदार मराठी शाळा, सुसज्ज हायस्कूल, ग्राम वाचनालय, वड आणि पाराचा कट्टा, आकर्षक हनुमान मंदिर, रामाचं देऊळ, लक्ष्मी मंदीर, दत्त मंदिर, वली हजरत दर्गा, समाजमंदिर आणि बारमाही गावच्या उशाला संथ वाहणारी कृष्णामाई!
कर्नाळ गावावर कृष्णामाईचे विशेष प्रेम आहे. कृष्णेच्या पाण्यावरच गावची सगळी शेती फुलते. बहरते. जरी कृष्णेच्या पाण्यावर गाव पोसला असला तरी महापूर आल्यानंतर गावात पाणी येत नाही. आजवर कृष्णामाईचे सर्व फायदे घेऊनही नदीचं पाणी कधीच गावात आलेलं नाही. आई जशी आपल्या लेकराला संभाळते तसं गावाला कृष्णामाईनं सांभाळलंय. वाढवलंय...
आणखी एक कर्नाळ गावाचं वैशिष्ट्य म्हणजे... सह्याद्रीच्या कुशित लपलेल्या ह्या गावास, तितक्याच ताकदीचा कणखर काळाकभिन्न दगडाचा धर लाभलेला आहे. त्यामुळेच, भुकंपाचे भय गावाला तसे कमीच. नैसर्गिक संपदेच्या दृष्टीने कर्नाळ गाव खूप नशिबवान आहे. म्हणूनच गावात काळ्या दगडाच्या कणखर छातीची, धाडसी माणसे जन्माला आली. खो-खो, कबड्डी, मल्लखांब, हाॅलिबाॅल, क्रिकेट या खेळाबरोबरच साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात गावाने नजरेत भरेल ,असा ठसा उमटविला आहे. नव्या-जुन्या गावकर्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने गावाचे नाव देशभर नेले आहे.
सर्व जाती-धर्माच्या लोकांना समानतेची, मानवतेची वागणूक देण्याची भूमिका नेहमीच गावाने आत्मसात केली आहे. म्हणूनच गावात सर्वच जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहात आहेत. अशा या कर्नाळ ग्रामपंचायतीने स्वर्गीय आर . आर. आबा पाटील सुदंर गाव योजने मध्ये सहभाग घेतला आहे . कारण गावात आरोग्य ,शिक्षण ,रोजगार ,स्वच्छ पाणी ,पक्के रस्ते,याबरोबर गावात एक प्रकारचे सामाजिक सदभावनेचे वातावरण आहे म्हणजेच माझं कर्नाळ गाव हे एक आदर्श गाव आहे.